कोळकी : विडणी हद्दीतील अब्दागिरेवाडीनजीक जाधववस्ती येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ५४ जनावरांची सुटका करून सुमारे १३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की, विडणी हद्दीतील अब्दागिरेवाडीनजीक जाधववस्ती येथे बिगर परवाना तीन ते पाच वर्षांची ५४ जनावरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने कोंबून ठेवली होती. जनावरांच्या खाण्या पिण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती. सदरची जनावरे बिगर परवाना नेण्यासाठी पिकअप गाडी सुद्धा त्याठिकाणी ठेवण्यात आली होती. ८ लाख ५० हजारांची ५४ जनावरे व ५ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी, असा एकूण १३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आला.
अझीम शबीर कुरेशी, इरफान याकूब कुरेशी, जावेद इमरान कुरेशी, तोफिक इम्तियाज कुरेशी, दिशांत इमाम कुरेशी सर्व कुरेशीनगर फलटण येथील आरोपी असून, यामधील तोफिक इम्तियाज कुरेशी यास ताब्यात घेतले आहे. याबाबत फिर्याद पोलीस कॉस्टेबल महेश जगदाळे यांनी दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत.