वाई : वाई तालुक्यात रुग्णसंख्या अटोक्यात आलेली आहे. आता ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे ४२ हजारांच्यावर लसीकरण झाले आहे. तरी शासनाने लस जास्त प्रमाणात उपलब्ध करून लसीकरण मोहिमेला गती द्यावी, अशी मागणी नागरिकामधून येत आहे.
तालुक्यात एप्रिल, मे मध्ये कोरोनाचा कहर वाढला होता. रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शनची कमी जाणवत असून उपलब्ध रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होताना दिसत होती. वाई शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ही लक्षणीय वाढत होती. मे मध्ये दीडशे ते दोनशेच्या घरात गेलेली पॉझिटिव्ह रुग्णांची सख्या आवाक्यात येऊन पन्नासच्या आसपास येऊ लागल्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
शासनाने कोरोना मुक्त गाव योजना जाहीर केली असून जी गावे आपले गाव कोरोनामुक्त करून कोरोनामुक्त राखतील त्यांना बक्षीस योजना ही जाहीर केली आहे. वाई तालुक्यात ४७ गावांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गाव कोरोना मुक्त केली आहेत.
वाई तालुक्यात मे महिन्यात २९२७ रुग्ण सापडले होते असून सध्या तालुक्यात ५३२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर मे-जून मिळून ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अलीकडच्या आठवड्यात पन्नासच्या आसपास आकडेवारी येत असल्याने काहीशी समाधानकारक परिस्थिती आहे.
कोट..
कोरोनाचे रुग्ण संख्येमध्ये जरी घट होत असली तरी नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात काही गावातून कोरोनाचे रुग्ण जास्त येत असून आपले कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.
- रणजित भोसले, तहसीलदार वाई