सातारा जिल्ह्यात ४६७ अतितीव्र कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:56 PM2018-10-03T23:56:01+5:302018-10-03T23:56:06+5:30

467 severely malnourished children in Satara district | सातारा जिल्ह्यात ४६७ अतितीव्र कुपोषित बालके

सातारा जिल्ह्यात ४६७ अतितीव्र कुपोषित बालके

googlenewsNext

प्रशांत कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ४,८१० अंगणवाड्यांमध्ये ४६७ अतितीव्र तर १,८३४ मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक ७२ तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी पाच कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या अहवालानुसार यावर्षी अती तीव्र बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले.
एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या वतीने जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आला. मध्यम तीव्र कुपोषित (मॅम), अतितीव्र कुपोषित (सॅम) अशा दोन प्रकारांत कुपोषित बालकांची वर्गवारी करण्यात आली. यापूर्वी कुपोषित बालकांना लोकसहभागातून पोषण आहार मिळत असे. यावर्षीपासून शासनाने अनुदान लागू केला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील स्थानिक पातळीवरील ग्राम बाल विकास केंद्रामार्फत ही योजना राबविली जाते. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचा अंगणवाडी, वाड्या-वस्त्यांमधून शोध घेतला जातो. त्यानंतर बालकांची वयोगट अन् वजन आदींबाबत तपासणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर या बालकांचा मॅम आणि सॅम या वर्गावारीत समावेश केला जातो.
जून २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अती तीव्र कुपोषित बालकांची संख्या सातारा तालुक्यात ७२, जावळी ६, कोरेगाव ४४, खंडाळा ३४, फलटण ५१, खटाव ३७, कºहाड ६९, पाटण ४५, महाबळेश्वर ६, माण २५ तर वाई तालुक्यात ४४ इतकी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनांतर्गत डिसेंबर २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ११८७ तर अतितीव्र कुपोषितांची संख्या १८६ इतकी होती. मार्च २०१६-१७ च्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८८७ तर तीव्र कुपोषितांची संख्या १२८ इतकी नोंदविली गेली होती. लोकसहभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामविकास केंद्राचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुुलनेत कºहाड तालुक्याची स्थिती चांगली आहे.
राज्य शासनाने या वर्षीपासून पोषण अभियान राबविला असून, यामध्ये राज्यातील ३७ जिल्ह्यांमधून केवळ सहा जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याचा सहभाग आहे. प्रथम टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यांना पोषण अभियान लागू केला आहे. पुढील वर्षापासून सातारा जिल्ह्याचाही पोषण अभियानात समावेश होणार आहे.
पोषण महिना अंतर्गत कृती आराखडा
पोषण महिना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्याचे वाटप करणे, प्रभात फेरी काढणे, पोषण आहारावर चित्रफीत दाखविणे, बालकांचे वजन व छाननी करणे, शाळामध्ये योग्य आहाराचे सेवन, महिलांसाठी योगा, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, बचत गटांची एकत्रित चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत जनजागृतीसाठी गृहभेटीसह विविध कार्यक्रम, आरोग्य व पोषण विषयाचे प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, विविध फळांच्या पोषाखासह फॅन्सी ड्रेस, शालेय निबंध स्पर्धा अशा अनेक योजनांचा प्रचार व प्रसिद्धी सध्या सुरू आहे.
अद्याप सुधारणा न झालेली ९१ बालके
ग्राम बाल विकास योजनेत दाखल झालेल्या ४१५ अती तीव्र कुपोषित २४७ बालकांची सुधारणा झाली असून, सर्वसाधारण श्रेणीमध्ये ८० बालकांचा समावेश झाला आहे. अद्याप सुधारणा न झालेल्या बालकांची संंख्या ९१ इतकी आहे. तर ग्राम बाल विकास योजनेत ४९ बालकांची नोंद पालकांकडून झाली नाही.

Web Title: 467 severely malnourished children in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.