कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेने ३१ मार्चपर्यंत साडेतेरा कोटी वसूल केले आहेत. पालिकेने साडेअठरा कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच थकबाकी वसुलीची मोहीम यशस्वी करून दाखवली; मात्र अद्यापही पाच कोटींची वसुली करणे बाकी राहिले आहे. त्यासाठी ज्या थकबाकीदारांनी रक्कम भरलेली नाही अशांच्या प्रॉपर्टीवर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. पालिकेने मागील वर्षासह या वर्षीची वसुली ही साडेअठरा कोटी करणे गरजेचे होते. ती वसुली करण्यासाठी पालिकेने अनेक उपाय राबविले. बँड पथकाच्या साह्याने थकबाकीदारांकडे रक्कम मागून तसेच प्रत्यक्ष मालमत्तेला सील ठोकण्याची कारवाई देखील केली. गेल्या तीन महिन्यांपासून आत्तापर्यंत पालिकेने शहरातील सुमारे पन्नासहून अधिक दुकान गाळ्यांना सील ठोकले तर सत्तरहून अधिक नळकनेक्शन तोडली आहेत. त्यानंतर थकबाकीदारांनी ३१ मार्चपर्यंत १३ कोटी २६ लाख ९७ हजार ३६१ रुपये भरले. तर ३१ मार्च या दिवशी एक कोटीची वसुलीची नोंद पालिकेच्या वसुली विभागात झाली. अतिक्रमण हटाव मोहिमेत न्यायालयीन प्रकरण व शासकीय कार्यालयांकडून ठेवण्यात आलेली थकबाकीची रक्कम ही दोन मुख्य कारणे कऱ्हाड पालिकेच्या कमी वसुलीबाबत होण्यापाठीमागची असल्याचे वसुली विभागातील कर्मचारी सांगतात. पाणीपट्टी, घरपट्टी, वीजकर, अग्निशामक, आरोग्यकर, सफाईकर अशा प्रकारच्या सात करांतून करण्यात येणाऱ्या वसुलीसाठी पालिकेच्या कर वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत बँड पथकही देण्यात आल्याने शहरातील नागरिकांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली. त्यातून वर्षानुवर्षे न भरणाऱ्या थकबाकीधारकांनी देखील आपली थकबाकीची रक्कम भरली; मात्र अद्यापही शासकीय कार्यालयांतून सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपये संकलित कराची रक्कम भरण्यात आलेली नाही. त्यांना पालिकेकडून याबाबत नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत. संकलित कर वसुलीच्या मोहिमेतून सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या वसुली अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी) आत्ता प्रत्यक्ष जप्तीची कारवाई... संकलित कराची रक्कम भरण्यासाठी पालिकेकडून ३१ मार्चपर्यंतची मुदत थकबाकीदारांना देण्यात आलेली होती. ज्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्या थकबाकीदारांच्या मालकीच्या प्रॉपर्टी सील करण्यात येणार आहेत. त्यावर पालिकेकडून टाळे ठोकण्यात येणार आहेत. कऱ्हाड पालिकेतील कर्मचाऱ्यांनी व वसुली विभागातील सर्व प्रभागातील वसुली अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे पालिकेला
वसुलीच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचता आले. अद्यापही पाच कोटींची वसुली करणे गरजेचे आहे. ती करण्यासाठी महिन्याभरात कडक स्वरूपात कारवाईची मोहीम राबवणार आहे. - विनायक औंधकर, मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका