प्रशासनाची मोहीम : मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडून जिल्हाभर सर्व्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे फोटो देणे बंधनकारक केलेले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारांचे फोटो घेण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. एकूण मतदारांपैकी ३८ हजार १४९ मतदारांनी अद्यापही मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे फोटो दिलेले नाहीत.
मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो आवश्यक आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये मतदार यादीमध्ये फोटोच नसल्याने गोंधळ उडाला होता. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांनी केंद्रप्रमुख यांनाच भेटीस धरण्याचा प्रकार जागोजागी घडला. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर मतदारांनी फोटो देण्याचे काम केले; परंतु अद्यापदेखील बऱ्याच लोकांनी याबाबत गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार नोंदणी तसेच ज्यांची पूर्वी नोंदणी झाले आहे अशा मतदारांची फोटो घेण्याचे काम सुरू ठेवले आहे. लोकांनी याबाबत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना मतदानासाठीदेखील मुकावे लागणार आहे किंवा त्यांची नावे वगळली जाण्याची शक्यतादेखील आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदार
२५ लाख ५७ हजार ४०६
स्त्री मतदार : १२ लाख ५१ हजार २१५
पुरुष मतदार : १३ लाख ६ हजार १३२
विधानसभानिहाय आकडेवारी
एकूण मतदार
फलटण : ३,३६,०८३
वाई : ३,३६,९१७
कोरेगाव : ३०३०४०
माण : ३०४६८९५
कऱ्हाड उत्तर : २९६९४०
कऱ्हाड दक्षिण : २९६१२४
पाटण : ३२०५४८
सातारा : ३३९५५९
वरच्या विधानसभानुसार छायाचित्र नसलेले मतदार
फलटण ७४७३
वाई १७५०
कोरेगाव १,६४३
माण ५,४६५
कऱ्हाड उत्तर ८६७
कऱ्हाड दक्षिण २,३२७
पाटण ४,५२७
सातारा १४,०९७
एकूण ३८,१४९
छायाचित्रे नसलेले मतदार
स्त्री १८,४७२
पुरुष १९,६७७
कोट
मतदार यादीमध्ये मतदाराचा फोटो असणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे. मतदारांनी गावामध्ये येणाऱ्या मतदान नोंदणी अधिकाऱ्याकडे स्वतःचा फोटो देणे आवश्यक आहे.
- नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक