किल्ले प्रतापगडावर पेटल्या ३६४ मशाली! मशाल महोत्सव दिमाखात

By सचिन काकडे | Published: October 20, 2023 09:54 PM2023-10-20T21:54:48+5:302023-10-20T21:54:58+5:30

हजारो शिवभक्तांची गडावर हजेरी

364 torches were lit on Pratapgad fort! | किल्ले प्रतापगडावर पेटल्या ३६४ मशाली! मशाल महोत्सव दिमाखात

किल्ले प्रतापगडावर पेटल्या ३६४ मशाली! मशाल महोत्सव दिमाखात

महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी रात्री ३६४ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी करण्यात आलेली फटाक्यांची आतषबाजी, ढाेल-ताशाचा गजर अन‌् जय भवानी.. जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटवून मशाल महोत्सव सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी नवरात्रोत्सवात मशाल महोत्सव साजरा केला जात असून, यंदा या महोत्सवाचे चौदावे वर्षे आहे. शुक्रवारी रात्री भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर साडेआठ वाजता  पारंपरिक वाद्याचा गजर व जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषांत मशाली प्रज्वलीत करण्यात आल्या. भवानी माता मंदिरापासून किल्ल्याच्या बुरुजापर्यंत पेटविण्यात आलेल्या माशालींनी गड व परिसर उजळून निघाला. हा देदिप्यमान सोहळा हजारो शिवभक्तांनी आपल्या डोळ्यात सामावून घेतला. किल्ल्याच्या चहुबाजूनी करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे किल्ल्याचे सौंदर्य उजळून निघाले. गडावर आलेल्या भाविकभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

किल्यावर दोन घट...
किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात. एक घट छञपती शिवाजी महाराजांच्या नावाने कारण  शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने, कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याचबरोबरच गेल्या चौदा वर्षांपासून गडावर मशाल महोत्सवही साजरा केला जात आहे. या महोत्सवाचे आयोजन हस्तकलाकेंद्राचे चंद्रकांत आप्पा उतेकर,संतोष जाधव, अभय हवलदार स्वराज्य ढोल पथक, माय भवानी सामाजिक संस्था प्रतापगड, वाडा कुंभरोशी ग्रामस्थ करीत असतात.

Web Title: 364 torches were lit on Pratapgad fort!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.