नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सातारा शहरापासून जवळच असणाऱ्या निकमवाडीत फलटण तालुक्यातील मेंढपाळाच्या २६ मेंढ्यांचा हिवराच्या शेंगा खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी पोहोचले. तसेच पुढील उपाययोजना सुरू करण्यात आली आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्याच्या आदर्की येथील मेंढपाळ सातारा तालुक्यात आले आहेत. मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधात ते गावोगावी जात आहेत. असे असतानाच सातारा शहरातील शाहूपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निकमवाडी नंबर दोन (आंबेदरे) आहे. याठिकाणी मेंढ्या चरत होत्या. त्यावेळी मेंढ्यांनी हिवराच्या शेंगा खाल्ल्या. या शेंगाचा त्रास झाल्याने जवळपास २६ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. तर हिवराच्या शेंगा खाल्ल्यानेच पाच मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत पशुसंवर्धन विभागाला सोमवारी सायंकाळी माहिती समजली. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. दिनकर बाेर्डे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार हेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. तसेच पुढील उपाययोजना करण्यास सुरूवात केली. रात्री उशिरापर्यंत अधिकारी घटनास्थळीच होते.