सातारा : दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत जिल्ह्यातील १७६ अंगणवाडी सेविका - मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. ९४ टक्के निकाल लागला आहे. यामुळे या ताईंनीही शिक्षणासाठी वयाची मर्यादा आडवी येत नसल्याचे दाखवून दिले आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाड्या चालविण्यात येतात. या अंगणवाड्यांवर सेविका आणि मदतनीस ही दोन पदे असतात. यामध्ये लहान मुलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे दिले जातात. तसेच खाऊ देण्यात येतो. यातून मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, हा उद्देश असतो. तसेच सेविका आणि मदतनीसांना अंगणवाडीबरोबरच इतरही अनेक कामे असतात. सर्वेक्षण करावे लागते.या अंगणवाड्यांवरील सेविका आणि मदतनीस या १०वी, १२वी नाहीतर पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्याही दिसून येतात. तसेच काही सेविका आणि मदतनीस या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्या आहेत. याचाच एक प्रकार म्हणजे नुकत्याच जाहीर दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील तब्बल १७६ सेविका आणि मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत.जिल्ह्यातून दहावी परीक्षेसाठी १९१ सेविका आणि मदतनीस पात्र ठरल्या होत्या. त्यामधील १८८ ताईंचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १५७ उत्तीर्ण झाल्या, तर एटीकेटीत १९ जण आहेत. १२ सेविका आणि मदतनीस अनुत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेत १७६ सेविका आणि मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचा उत्तीर्णतेची टक्केवारी ९४ टक्के इतकी राहिली आहे. त्यामुळे या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनीही दहावी परीक्षेतील यशातून शिक्षणाचा नवा अध्याय लिहिल्याचे स्पष्ट होत आहे.
माण, वाई अन् महाबळेश्वरचा निकाल १०० टक्केजिल्ह्यातील १७६ सेविका आणि मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. माण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील परीक्षेस बसलेल्या सर्व सेविका आणि मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कोरेगाव आणि फलटण तालुका ९७ टक्के, पाटण ९४, सातारा ९१, खटाव ८९, कऱ्हाड तालुका ८८ टक्के, जावळी तालुक्याचा ८६ टक्के निकाल लागला आहे.
१२वी उत्तीर्ण आवश्यकपूर्वीच्या काळी सेविका होण्यासाठी सातवी उत्तीर्ण आवश्यक होते. त्यानंतर दहावीची पात्रता आली. सध्या १२ उत्तीर्ण असल्याशिवाय सेविका आणि मदतनीसही होता येत नाही. सातारा जिल्ह्यात सध्या ४ हजार ५६२ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये सात हजारांहून अधिक सेविका आणि मदतनीस आहेत.