फलटण : पराक्रमी योद्धे मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव असलेल्या फलटण तालुक्यातील मुरूम येथील पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे,’ अशी माहिती राज्य सहकारी दूध महासंघाचे व्हा. चेअरमन डी. के. पवार यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने मुरूम हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मागणीस मान्यता देऊन ‘ब’ क्षेत्राचा दर्जा दिला. पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले आहे. त्यापैकी विकास कामाचा प्रारंभ ‘महानंद’चे व्हाईस चेअरमन डी. के. पवार, फलटण पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच प्रियंका बोंद्रे, उपसरपंच संतोष बोंद्रे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पोलीस पाटील वनिता संकपाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी फलटण बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या संपर्कातून महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे वंशज महाराजा श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी मुरूम गावी भेट दिली आहे.
यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते.
पवार म्हणाले, ‘महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून मुरूमचा विविधांगी विकास करण्याची योजना रामराजे व फलटणच्या राजघराण्याच्या माध्यमातून तयार करण्यात येत असताना राज्य शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.’
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या फलटण उपविभागाच्या माध्यमातून मंजूर विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येतील याची ग्वाही संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.
या कामामध्ये ५० लाख ३४ हजार रुपये भक्त निवास, २८ लाख ३९ हजार रुपये सभा मंडप, ३० लाख ३० हजार रुपये नीरा नदी घाट, ८ लाख ३८ हजार रुपये स्वच्छता गृह, ४ लाख ३२ हजार पथ दिवे आणि २९ लाख २८ हजार रुपये अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण कामाचा समावेश आहे,’ अशी माहिती उपअभियंता सुनील गरुड यांनी दिली.