फलटण : जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात ११९ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात ३४ व्यक्ती तर ग्रामीण भागात ८५ रुग्ण सापडले आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच ११९ रुग्ण सापडले आहेत. यामुळे फलटण तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून, ही बाब चिंताजनक आहे. भाजी मंडईत प्रचंड गर्दी होऊन सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
फलटण शहरात ३४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये फलटण ९ , लक्ष्मीनगर ९, मलटण ४, कसबा पेठ ४, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ १, शिंपी गल्ली १, नारळी बाग १, पुजारी कॉलनी १ तसेच तेली गल्ली येथील एका व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ग्रामीण भागात ८५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये विडणी द्हाबिघे १३, विडणी ३, तरडगाव ८, अलगुडेवाडी ८, कोळकी ५, साखरवाडी ४, शिंदेघर १, खुंटे १, ठाकुर्की १, राजुरी २, हिंगणगाव १, सासवड ३, फरांदवाडी १, बरड ४, जावली ४, फडतरवाडी ३, गुणवरे १, ताथवड १, शिंदेवाडी १, सांगवी २, दुधेबावी १, पवारवाडी १, खटकेवस्ती ३, राजाळे ४, साटेफाटा १, सरडे १, जाधववाडी २, चौधरीवाडी १, तडवळे १, आळेवाडी १, धुळदेव १ तसेच मुंजवडी येथील एका व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, फलटण शहरात शंकर मार्केट येथे भरणाऱ्या मंडईमध्ये सकाळच्या वेळी भाजी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असून, भाजी विक्रेते एकमेकांना चिकटून बसत असल्याने तसेच खरेदी करणारे व विक्री करणारे मास्क घालत नसल्याने कोरोनाचा धोका वाढलेला आहे. भाजी मंडईच्या ठिकाणी नागरी वस्ती असल्याने कोरोनाचा संसर्ग गर्दीमुळे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मंडईमध्ये भाजीविक्रेते एकमेकांपासून लांब बसवून विनामास्क वावरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी आणि नगरपालिका प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. दुपारी १२ नंतर भाजी विक्रेते उठून दुसरीकडे जात असतात. त्या वेळी ते बसलेल्या ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या केर, कचऱ्याची त्वरित साफसफाई करणे गरजेचे आहे. वेळोवेळी गर्दीच्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून आणि भाजी विक्रेत्यांकडून होत आहे.
कोट...
फलटण शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. फलटण नगर परिषद फारच दुर्लक्ष करीत आहे. शंकर मार्केट व राजवाडा परिसरात भाजी विक्रेते अक्षरश: मेन रोडवर भाजी विकायला बसतात. रोज या ठिकाणी अपघात होतात. नागरिक व वाहनांची प्रचंड गर्दी असते. नगर परिषद याकडे का दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत व सुरक्षित अंतर ठेवत नाहीत. नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी वरिष्ठांनी यात लक्ष घालावे.
- अनिल जाधव, माजी नगरसेवक