जिल्हा परिषद अध्यक्ष कोरे यांनी रद्द झालेल्या विंधन विहिरी, मागासवर्गीय शौचालय अनुदानात गैरव्यवहार तसेच ग्रामसेवक बदली प्रकरणातील अनियमितेबाबत गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद उमटले. आमटवणे यांनी कोरे यांच्या आरोपाचे पत्रकार बैठकीत खंडन केले. आमटवणे म्हणाले, सरगर यांचे कार्य कामकाजाला गती देणारे असताना अध्यक्ष कोरे यांचे आरोप बालिशपणाचे आहेत. आरोप केलेले तीनही विषय तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांच्या काळातील आहेत. या विषयांची ज्या त्यावेळी चौकशी होऊन अहवाल जिल्हा परिषदेकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत. काही विषय निकालात निघाले आहेत. अध्यक्षांनी सुचविलेल्या ग्रामसेवक बदलीसारख्या नियमबाह्य कामांना दाद न दिल्याने तसेच वड्डी येथील बंधारा काम ग्रामस्थांनी बंद पाडल्याचा राग सरगर यांच्यावर काढण्यासाठीच त्यांची बदनामी सुरू केली आहे. गटविकास अधिकारी चुकले असतील तर आम्ही अध्यक्षांच्या बाजूने राहू, ते चुकले नसतील तर त्यांची पर्यायाने पंचायत समितीची बदनामी सहन करणार नाही.
ते म्हणाले की, पदाचा गैरवार न करता बहुमत गमावलेल्या अध्यक्ष कोरे यांनी पदाचा राजीनामा देऊन आरोप करावेत.
चौकट
बोलण्याचा अधिकार नाही !
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अरुण राजमाने यांनी पंचायत समितीला एक कोटींचा विकास निधी दिला. मात्र कोरे यांनी एक रुपयाचाही निधी न देता सुचविलेल्या कामाकडेही दुर्लक्ष केले. कत्तलखान्याच्या विषयाकडेही लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे कोरे यांना कोणत्याच विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, असा आरोपही आमटवणे यांनी केला.