कुपवाड : मिरज एमआयडीसीत पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटारसायकलचा अपघात झाल्याने सूरज तानाजी कोळी (वय २४, रा. म्हैसाळ ता. मिरज) या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच दुचाकीवरील विजय गिड्डे याच्यावर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे.
शनिवारी रात्री सूरज कोळी व त्याचा मित्र विजय गिड्डे हे दोघे दुचाकीवरून (एम. एच.१० बी. एस. ६५२) मिरज एमआयडीसीतील रस्त्यावरून जात होते. यावेळी रस्त्यातील खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने मोटारसायकल खड्ड्यात जाऊन दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी कोळी व गिड्डे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच आयुष हेल्पलाईन टीमने जखमींना सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी सूरज कोळी याचा मृत्यू झाला. तर गिड्डे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे. पोलीस तपास करीत आहेत.