सदानंद औंधे -मिरज -विधानसभा निवडणुकीसाठी झेंडे, बिल्ले, टोप्या, हॅन्डबिले या पारंपरिक प्रचार साहित्याऐवजी यावेळी सोशल मीडियावरील प्रचाराला उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे. व्हॉटस्-अॅपवर उमेदवारांचे प्रचार साहित्य पाठविणारे सॉफ्टवेअर बाजारात आले आहे. हॅन्डबिले, झेंडे, टोप्या, टी-शर्ट, स्टीकर, मफलर यासोबत पावसाळी छत्र्यांचा प्रचारासाठी वापर होणार आहे. उमेदवाराच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाची छपाई केलेल्या छत्र्या प्रचारासाठी मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीपासून मतदार चिठ्ठी वाटप निवडणूक यंत्रणेमार्फत होत आहे. मात्र उमेदवाराच्या बूथ व मतदार यादीतील नाव व क्रमांकासह मतदार स्लीप कीट बाजारात आले आहे. विधानसभेची मतदार यादी बूथवरील मतदारांची अल्फाबेटिक यादी, मतदान चार्ट, मतदारांची नावे असलेल्या स्लीपा, बूथवर होणाऱ्या मतदानाची नोंद करण्याचा चार्ट आदींचा यात समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघातील बूथ संख्येनुसार प्रत्येक बूथच्या मतदारांच्या नावाची स्लीप असलेले कीट उपलब्ध करण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघातील विविध कंपन्यांच्या मोबाईल टॉवरखाली कार्यरत असलेल्या मोबाईल क्रमांकांची यादी घेऊन त्यातील व्हॉटस्-अॅपची सोय असलेल्या मोबाईल क्रमांकावर व ग्रुपवर उमेदवाराच्या प्रचारसभेची, प्रचार बैठकीची माहिती, विरोधी उमेदवाराबाबत वेगवेगळ्या कॉमेंट, उमेदवारांचे गुणगान करणारे पोस्टर संगणकावर तयार करून देण्यात येत आहे. प्रचारासाठी व्हॉटस्-अॅप सॉफ्टवेअरलाही उमेदवारांची मागणी आहे. मोठ्या आकारातील एलईडी स्क्रीन टेम्पोसारख्या वाहनात लावून उमेदवाराच्या कार्याची माहिती देणाऱ्या व्हिडिओ क्लीप मतदारसंघातील गावागावांत दाखविण्याचीही सेवा भाड्याने उपलब्ध झाली आहे.फेसबुकवर पोस्ट करण्यासाठीही उमेदवाराच्या प्रचार साहित्याची निर्मिती करण्यात येत आहे. उमेदवारांकडून त्यास मागणी असल्याचे मिरजेतील तंत्रज्ञ सुनील मोतुगडे व शमशुद्दीन बारगीर यांनी सांगितले. पारंपरिक प्रचारसाहित्यापेक्षा यावेळी सोशल मीडियावर प्रचाराचे उमेदवारांचे नियोजन आहे. उमेदवारांना व्हॉटस्-अॅपवर प्रचारसाहित्याचे डिझाईन करून देणाऱ्या तंत्रज्ञांना मागणी आहे. व्हॉटस्-अॅप व फेसबुकवर प्रचारसाहित्य अपलोड करणारी सॉफ्टवेअर निर्मिती करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या प्रचारासाठी तज्ज्ञ व जाणकार मंडळींना विधानसभा निवडणुकीत चांगलाच व्यवसाय मिळणार आहे. खर्चात बचत, मोजमापही नाही!निवडणूक विभागाची परवानगी किंवा खर्चाबाबत सोशल मीडियावरील प्रचाराचे मोजमाप होत नाही. पारंपरिक प्रचार साहित्यापेक्षा प्रभावी, आकर्षक व प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत प्रचारात आघाडी घेण्यासाठी सोशल मीडियावरील प्रचार उमेदवारांसाठी सोपा, सुटसुटीत व आवश्यक ठरला आहे.
यंदा सोशल मीडियावरच भर
By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST