लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : श्रुतपंचमीनिमित्त दक्षिण भारत जैन सभेच्या परमपूज्य १०५ ज्ञानमती माताजी केंद्रीय ग्रंथालयात ‘जिनवाणी’ ग्रंथपूजन करण्यात आले.
जैन धर्मामध्ये श्रुतपंचमीस महत्त्व आहे. जैन धर्मातील पहिला लिखित ग्रंथ म्हणजे ‘षट्खंडागम्’. आचार्य धरसेनाचार्य यांच्याकडून प्राप्त केलेले श्रुतज्ञान ‘षट्खंडागम’ या ग्रंथाच्या रूपाने आचार्य पुष्पदंत व आचार्य भूतबली यांनी प्राकृत भाषेत लिपिबद्ध केले. लेखनपूर्तीनंतर ज्येष्ठ शुद्ध पंचमी या दिवशी ‘षट्खंडागमा’ची पूजा मोठ्या भक्तिभावाने करून श्रुतदेवीविषयी श्रद्धा व्यक्त केली. तेव्हापासून ज्येष्ठ शुद्ध पंचमीला ‘जिनवाणी’ ग्रंथाची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते आणि सम्यक्ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रेरणा घेतली जाते.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, विभागीय उपाध्यक्ष प्रशांत पाटील-मजलेकर, महामंत्री शांतिनाथ नंदगावे, आदी उपस्थित होते.