पलूस : किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर कोल्हापूरहून गोंदियाला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसखाली सापडलेली तरूणी रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बचावली. जवळच असलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या यंत्रणेची मदतीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावपळ करून तिला वाचविले.कोल्हापूरहून गोंदियाला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस शनिवार दि. ७ रोजी निर्धारित वेळेत सायंकाळी किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकात आली. थांबा घेऊन गाडी पुढे निघाली असताना, मारिया बाबासाहेब सदामते (रा. बुर्ली, ता. पलूस) ही २१ वर्षीय युवती गाडी चुकणार, या भीतीने धावत जाऊन गाडी पकडत होती. अचानक पाय घसरून ती रेल्वेखाली जाऊ लागली. मात्र पाठीवरील बॅगमुळे ती खाली न जाता रेल्वेच्या डब्याची (बोगी क्र. एस ८) पायरी व रेल्वे प्लॅटफॉर्म यामध्ये अडकून फरफटत जाऊ लागली. स्थानक प्रबंधक आर. एच. वानखेडे व मिलिंद मानुगडे यांच्यासह ताकारीचे स्टेशन मास्टर यादव यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यांनी चालकाला सूचना करून क्षणात गाडी थांबविली. यादरम्यान मारिया किमान ८0 मीटर फरफटत गेली होती. तिच्या कमरेखालील भाग पूर्णपणे प्लॅटफॉर्मखाली अडकला होता. रेल्वे थांबताच मानुगडेंसह रेल्वे गार्ड व सहकाऱ्यांनी प्लॅटफॉर्म फोडून मुलीची सुटका करायचा प्रयत्न केला. पण घट्ट असलेला कठडा फोडणे शक्य झाले नाही. लगेचच मानुगडे यांनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे व्यवस्थापक प्रवीण गवळी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तात्काळ गॅस कटर, स्टोन ब्रेकर, वायर, अॅम्ब्युलन्ससह मदतीसाठी पथक धावले. काही क्षणातच प्लॅटफॉर्मचा कठडा फोडून मारियाची सुखरूप सुटका केली. (वार्ताहर)‘किर्लोस्कर’ची मदत : मानवतेचे दर्शनकिर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनजवळच जुनी पंप उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीचा हात देत असते. २००४ च्या महापुरातसुध्दा मानवतेचे दर्शन घडविले होते. तीच परंपरा काल व्यवस्थापक प्रवीण गवळी यांनी राखली. यावेळी कार्यालयीन नियम बाजूला ठेवून मदतीसाठी धाव घेऊन डब्याची पायरी गॅसने कापून काढत मुलीची सुटका केली. यावेळी उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर रेल्वे सुरळीत पुढे सोडण्यात आली. +किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वेखाली सापडलेल्या तरूणीस सुखरूप वाचविण्यात आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
एक्स्प्रेसखाली अडक लेल्या तरुणीची सुखरूप सुटका
By admin | Updated: May 9, 2016 00:36 IST