फोटो : २३०८२०२१एसएएन ०१ : बेडग (ता. मिरज) येथे अपघातानंतर जमावाने डंपरवर दगडफेक करून मोडतोड केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत बेडग (ता. मिरज) येथील मुक्ताबाई नामदेव जाधव (वय ५५) या जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी जिल्हा परिषद शाळेसमोर घडली.
मृत मुक्ताबाई जाधव मुलासोबत लस घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत आल्या होत्या. लस घेतल्यानंतर त्या मुलाच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० सीएल २२३१) घरी जात होत्या. काही कामानिमित्ताने त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम वाहतूक करणारा डंपर (क्र. एमएच १० सीआर ६५९४) मिरजकडून बेडगच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता. वेगाने आलेल्या डंपरने रस्त्याकडेला थांबलेल्या जाधव यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गर्दी जमा झाली. डंपरचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने संतप्त ग्रामस्थांनी डंपरच्या चाकांची हवा सोडली. डंपरवर तुफान दगडफेक करून काचा फोडल्या, तोडफोड केली.
याप्रकरणी मिरज ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते.