लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णेच्या कार्यक्षेत्रातील दक्षिणेकडील शेवटचे गाव म्हणजे वाळवा तालुक्यातील कामेरी. येथे असलेल्या सभासदांची संख्या पाहता यशवंतराव मोहिते यांनी कामेरीला अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळाले. नंतर सलग वीस वर्षे संचालकपद कामेरीकडे होते. त्यानंतर दहा वर्षे येथे उमेदवारी नव्हती. यावेळी मात्र रयत पॅनलने प्रा. अनिल पाटील यांना उमेदवारी देऊन या गावचा खंडित झालेला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. रयतचा झेंडा कामेरीचा गड राखणार का? याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता आहे.
यशवंतराव मोहिते यांनी १९६० साली लावलेल्या कृष्णेच्या रोपट्याचा बघता बघता वटवृक्ष झाला आहे. सुरुवातीच्या काळात मोहिते यांनी कामेरी येथील आबासाहेब पाटील यांना संचालक केले. दरम्यान, त्यांना उपाध्यक्षपदी संधी दिली. १९८९ मध्ये जयवंतराव भोसले यांना पायउतार व्हावे लागले आणि मदनराव माेहिते अध्यक्ष झाले. त्यांनी आबासाहेब पाटील यांचे बंधू सर्जेराव पाटील यांना सलग १० वर्षे संधी दिली. यादरम्यान सहा महिने सर्जेराव पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाचीही जबाबदारी हाेती. सुरेश भोसले अध्यक्ष झाल्यानंतर कामेरीच्या संचालक पदात खंड पडला. नंतर डॉ. इंद्रजित मोहिते अध्यक्ष झाले आणि रयत पॅनलकडून पुन्हा सर्जेराव पाटील संचालक झाले.
नंतरच्या काळात रयत आणि सहकार पॅनलच्या मनोमिलनाचे राजकारण रंगले. यातूनच आबासाहेब मोहिते यांच्या घरातून अविनाश मोहिते यांच्या रूपाने तिसऱ्या नेतृत्वाचा उदय झाला. सभासदांनीही संस्थापक पॅनल उचलून धरले. ‘रयत-सहकार’ मनोमिलनातून झालेल्या अंतर्गत वादामुळे कामेरीला संचालकपद मिळाले नाही. अविनाश मोहिते यांची कारकीर्द वादळी ठरली. त्यानंतर गतवेळची निवडणूक तिरंगी झाली. यामध्येही तिन्ही पॅनलनी कामेरीला न्याय दिला नाही. रयतचे पॅनल भुईसपाट झाले आणि कामेरीचे कृष्णेवरील वर्चस्व संपुष्टात आले.
या निवडणुकीत पुन्हा कामेरीत रयतने आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छाया पाटील यांचे पती प्रा. अनिल पाटील यांच्या हाती रयतचा पुन्हा झेंडा फडकू लागला आहे. अनिल पाटील हे जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. कामेरीतील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य रणजित पाटील सध्यातरी प्रचारात नसले तरी त्यांचे समर्थक सहकारकडे आहेत. सुनील पाटील हेही थेट सहकार पॅनलकडून प्रचारात आहेत. जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांचे सर्व समर्थक डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रचारात आहेत. शिवाजीराव नाईक गटाचे शहाजी पाटील यांनीही सहकारला पाठिंबा दिला आहे. संस्थापक पॅनलकडे असणारे एम. के. जाधव उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन सहकार पॅनलकडे दाखल झाले आहेत. जाधव हे जिल्हा परिषद सदस्य सुरेखा जाधव याचे पती आहेत. त्यामुळे पोपट कदम आणि त्यांचे समर्थक संस्थापक पॅनलच्या प्रचारात आहेत. नाईक गटाच्या पंचायत समिती सदस्य सविता पाटील यांनीही सहकार पॅनलला पाठिंबा दिला आहे. यामुळे रयतचा झेंडा कामेरीचा गड राखणार का? याबाबत उत्सुकता आहे.
कोट
डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्यपद्धतीमुळे उसाला दर मिळाला आहे. विविध पदांवर काम करत असताना कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपला राजकीय संपर्क आहे. याचा फायदा सहकार पॅनलला होईल. कामेरी गावातही आमचा गट एकदिलाने सहकारच्या पाठीशी आहे.
- सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक
चौकट
विश्वजित कदम यांचे ‘रयत’ला बळ
रयत पॅनलचे उमेदवार प्रा. अनिल पाटील आणि त्यांच्या पत्नी छाया पाटील यांनी कामेरीसह बोरगाव, रेठरेहरणाक्ष गटात संपर्क वाढवला आहे. त्याच्याबरोबर इस्लामपुरातून आनंदराव मलगुंडे हेही उमेदवार आहेत. राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा गट त्यांच्या पाठीशी ठाम असल्याने रयतच्या उमेदवारांमध्ये प्रचारासाठी ऊर्जा आली आहे.