नालेसफाईतून कोणाचे कोटकल्याण?, सभेत आरोग्य अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:26 PM2020-02-14T16:26:25+5:302020-02-14T16:28:00+5:30

सांगली महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईवरील दीड कोटी रुपयांच्या खर्चावरून गुरूवारी स्थायी समिती सभेत आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांनी, या खर्चातून महापालिका स्वत:ची यंत्रणा उभी करू शकते. दरवर्षी निविदा काढून कोणाचे कोटकल्याण केले जात आहे? असा सवाल उपस्थित केला.

 Whose Kotakalyan from Nalasfai ?, Health Officers in the House | नालेसफाईतून कोणाचे कोटकल्याण?, सभेत आरोग्य अधिकारी धारेवर

नालेसफाईतून कोणाचे कोटकल्याण?, सभेत आरोग्य अधिकारी धारेवर

googlenewsNext
ठळक मुद्दे नालेसफाईतून कोणाचे कोटकल्याण?सभेत आरोग्य अधिकारी धारेवर

सांगली : महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईवरील दीड कोटी रुपयांच्या खर्चावरून गुरूवारी स्थायी समिती सभेत आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांनी, या खर्चातून महापालिका स्वत:ची यंत्रणा उभी करू शकते. दरवर्षी निविदा काढून कोणाचे कोटकल्याण केले जात आहे? असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, सभापती संदीप आवटी यांनी, यंदा यंत्रसामग्री खरेदी करून नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे खासगी एजन्सीद्वारे नालेसफाईस मंजुरी देत, पुढील वर्षी महापालिकेने स्वत:ची यंत्रणा उभी करावी, असे निर्देश दिले.

स्थायी समितीची सभा सभापती आवटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेत पावसाळापूर्व नालेसफाईसह समान कर्मचारी वाटप, शववाहिका खरेदी या विषयांवरही जोरदार चर्चा झाली. नालेसफाईवर दरवर्षी तीस लाख रुपये खर्च होतात, यंदा मात्र प्रशासनाने तब्बल दीड कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला बहुतांश नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

मनोज सरगर यांनी या निधीतून महापालिकेला पोकलॅन, जेसीबी, टिप्पर ही वाहने खरेदी करता येऊ शकतात. त्यानंतर महापालिका स्वत:च नालेसफाईचे काम करू शकते. त्यासाठी खासगी एजन्सीची आवश्यकताच भासणार नाही असा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी नालेसफाईतून ठेकेदाराचे कोटकल्याण केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

अखेर सभापती आवटी यांनी, आता यंत्रसामग्री खरेदी करून नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे या वर्षापुरते ठेकेदार नियुक्तीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. पुढीलवर्षी महापालिकेने स्वत:ची यंत्रणा उभी करावी, अशी सूचनाही शहर अभियंत्यांना यावेळी केली.

महापालिका क्षेत्रासाठी दोन शववाहिका खरेदी करण्याचा विषय रद्द करण्यात आला. निविदाधारकाने शववाहिका उपलब्ध नसल्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे सभापती आवटी यांनी, शववाहिकेची आवश्यकता लक्षात घेऊन कमी कालावधीची फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले.

सदस्यांनी स्वच्छतेच्या कामासाठी समान सफाई कामगारांचे वाटप करण्याची मागणी सभेत केली. त्यावर दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन सभापतींनी दिले. महापालिका क्षेत्रातील शाळांची दुरवस्था झाली आहे. पंचशील नगरमधील शाळा नंबर २९ मध्ये साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. पण तेथील इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्वच शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 

Web Title:  Whose Kotakalyan from Nalasfai ?, Health Officers in the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.