सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सात दिवसांची वाढ करूनही रस्त्यावरील गर्दी कायम आहे. २६ मेपर्यंत लॉकडाऊन असतानाही गर्दी वाढतच असल्याने आता सांगली मार्केट यार्डातील होलसेल किराणा माल विक्री उद्या, रविवारपासून बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले.
जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १९ मेपासून २६ मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात मार्केट यार्डातील किराणा माल विकणाऱ्या होलसेल विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वेळेत किरकोळ किराणा माल विक्रेत्यांना मालविक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती.
सात दिवसांच्या वाढविलेल्या लॉकडाऊन कालावधीत किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेत्यांना सकाळी सात ते रात्री आठवाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही सेवा देणाऱ्या किरकोळ किराणा विक्रेत्यांना साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ही मुभा देण्यात आली होती. मात्र, गर्दी वाढतच चालल्याने आता लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजेच २६ मेपर्यंत विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.