सांगली : तासगाव साखर कारखाना एका वर्षाच्या मुदतीने चालविण्यास कोणी तयार असल्यास अवसायक मंडळाने राज्य बँकेकडे प्रस्ताव द्यावा, त्यांच्याकडे कारखाना दिला जाईल, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, राज्य बँकेच्या या भूमिकेमुळे अवसायक मंडळाची गोची झाली असून, कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आला आहे.तासगाव कारखान्याच्या विक्री व्यवहाराबाबत अवसायकांनी डी. आर. ए. टी. (ऋण वसुली व अपिलीय प्राधिकरण) न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. गणपती जिल्हा संघाशी झालेला विक्री व्यवहार रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल आहेत. हे कारण दाखवून कारखाना २०१४-१५ या गळीत हंगामाकरिता एका वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकराराने देण्याबाबत निविदा काढण्यात आली होती. एका वर्षासाठी अडीच कोटी रुपये स्थिर भाडे व प्रतिटन शंभर रुपयेप्रमाणे गाळपावर भाडे आकारण्यात येणार होते. कारखाना सुरू करायचा झाल्यास यंत्रसामग्रीच्या नूतनीकरणासाठी सात कोटी खर्च अपेक्षित आहे. अडीच लाख टन गाळप ग्राह्य धरल्यास स्थिर भाड्यासह किमान पाच कोटी रुपये भाडे होणार आहे. त्यामुळे बारा कोटी गुंतवून एका वर्षात भाडेपट्ट्यावर कारखाना चालविणे परवडणारे नाही. त्यामुळे एकही कारखाना आणि सहकारी संस्था तासगाव कारखाना अल्प मुदतीत चालविण्यास तयार नव्हती़ एकही निविदा दाखल न झाल्यामुळे तासगाव कारखान्याचा गळीत हंगाम बंद राहण्याची शक्यता होती़ त्यामुळे सभासद आणि कारखाना बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री आऱ आऱ पाटील आणि पालकमंत्री डॉ़ पतंगराव कदम यांच्याकडे कारखाना अवसायक मंडळाकडे देण्याची मागणी केली होती़ त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवसायकांकडे कारखाना देण्याबाबत सूचना दिली होती़ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाने प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे आज, मंगळवारी सादर केला, असे कर्नाड यांनी सांगितले़ ते म्हणाले की, न्यायालयात दोन याचिका असल्यामुळे तेथील निर्णय झाल्याशिवाय कारखाना दीर्घ मुदतीने भाड्याने देता येत नाही़ त्यामुळे कारखाना एक वर्षाच्या मुदतीने चालविण्यास कोणी तयार असेल तर, अवसायक मंडळाने प्रस्ताव द्यावा़ प्रस्ताव योग्य असल्यास कारखाना वर्षाच्या मुदतीने भाड्याने चालविण्यास देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले़
तासगाव कारखाना कोणीही चालवावा !
By admin | Updated: September 3, 2014 00:06 IST