कसबे डिग्रज : हनुमाननगरी तुंग (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी ३० जणांच्या दोन पॅनलमध्ये रंगतदार लढाई होत आहे. राष्ट्रवादी, शेतकरी संघटना यांनी युवक नेते सचिन डांगे यांना एकटे पाडत चक्रव्यूह तयार केला आहे, तर डांगे यांनी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्थानिक गटांना एकत्र करून दहा वर्षांच्या विकासाच्या जोरावर विरोधकांना कोंडीत पकडले आहे. आता निकालात चक्रव्यूहात कोण फसले, हे दिसणार आहे.
वसंतदादा साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे आणि माजी उपसरपंच विलास डांगे यांनी कल्पकतेने सर्व नेत्यांशी संपर्क साधून, पंचायत समिती सदस्या जयश्री डांगे यांच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या आहेत. सध्या त्यांनी डांगे, वाईंगडे, दळवी, भानुसे, बिरणले या गटांबरोबर सुधार समितीला सोबत घेत थेट संवाद, संपर्क साधून प्रचाराचा धुराळा उडवला आहे. सुधार समितीला दोन जागा देऊन उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. विरोधकांना कोंडीत पकडले आहे.
दरम्यान, दहा वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादीने तुकाराम दळवी गट आपल्या बाजूने केला आहे. सर्व पाटील, कदम गट आणि शेतकरी संघटना आपल्या बाजूने घेऊन तगडे पॅनल उभे केले आहे. हे गाव पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघात असूनही सत्ता नाही. त्यामुळे संपूर्ण मिरज पश्चिम भागातील राष्ट्रवादी येथे एकवटली आहे. निवडणुकीतील सर्व प्रकारच्या नीतींचा वापर केला जात आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
चौकट
मतदान चुरशीने, निकालही रंगतदार
सत्ता राखण्यासाठी काँग्रेस आघाडी, तर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी आघाडी विविध नीतींचा वापर करीत आहे. मतदारांना विविध आमिषे दाखविली जात आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.