सांगली : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची लॉटरी उद्या होणाऱ्या महासभेत निघणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून स्थायीत वर्णी लावण्यासाठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. त्यामुळे स्थायी निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सदस्य निवडीवरच सभापती निवडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले होते. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, स्वाभिमानीच्या दोन सदस्यांचा समावेश होता. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर सदस्य निवडीचा निर्णय घेतला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून इच्छुकांनी स्थायीत वर्णी लागावी, म्हणून पक्षाच्या नेत्यांकडे साकडे घातले होते. काल सायंकाळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन मते आजमाविली. काँग्रेसकडून सांगलीवाडीचे दिलीप पाटील, मिरजेचे धोंडुबाई कलकुटगी, हारुण शिकलगार, किशोर लाटणे, कुपवाडचे प्रशांत पाटील इच्छुक आहेत. राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी वगळता सर्वच सदस्यांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगलीत नगरसेवकांची भेट घेतली होती. नगरसेवक राजू गवळी, कुपवाडचे शेडजी मोहिते, जुबेर चौधरी यांच्यासह माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संगीता हारगे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या सहा अपक्षांनीही स्थायी सदस्यपदाची मागणी केली आहे. स्वाभिमानी आघाडीत भाजप, शिवसेना अशी उभी फूट पडली आहे. गटनेते शिवराज बोळाज हे माजी आमदार संभाजी पवार समर्थक असल्याने स्थायी निवडीत पवार गटाचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. तरीही भाजपच्या सदस्यांना पवार यांची भेट घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सद्य स्थितीत तरी पवार गटातील सदस्याची स्थायीत वर्णी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)नागरी प्रश्नांवर महासभेत गदारोळ शक्यशहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रस्त्यांची कामे सुरू असली तरी, अनेक भागात अद्याप कामाला मुहूर्त मिळालेला नाही. अजूनही बरेच रस्ते खड्ड्यात आहेत. त्यात डेंग्यूची साथी पसरत चालली आहे. आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाकडून दररोजचा कचरा उठाव होताना दिसत नाही. शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. त्यासाठी उद्या गुरुवारी होणाऱ्या महासभेत नागरी प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे. सत्ताधाऱ्यांनी चर्चेला वेळ द्यावा, असे विनंतीही करू, असे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. मिरजेत आज धरणेमिरज : पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मिरज शहरातील नागरी सुविधांच्या मागणीसाठी उद्या गुरुवार, दि. २० रोजी महापालिका कार्यालयासमोर ढोल, ताशा वाजवून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील आरोग्य सुविधा, रस्ते, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ढासळली आहे, मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ढोल, ताशा वाजवून निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
स्थायीची लॉटरी कोणाला?
By admin | Updated: November 19, 2014 23:24 IST