अखेर कोरोनाने महापौरांना गाठलेच. कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून लोकांना अनेक उपाययोजना केल्या. कुणी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधे, काढा घेतला तर कुणी उपास-तापासही केले. सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मात्र आपल्या नेत्यांचा आदर्श घेत जापनीस यंत्रावर भरवसा ठेवला. हे यंत्र गळ्यात घातले की कोरोना होत नाही, असा त्यांचा समज होता. दिवसभर ते गळ्यात यंत्र घालूनच फिरत होते. शेवटी त्यांना कोरोनाने गाठलेच. सोमवारी त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. सूर्यवंशींनी अनेकांना हे यंत्र दिले होते. यंत्र घालूनही महापौरांना कोरोना झाल्याने या मंडळींचा यंत्रावरील भरवसा उठला. त्यांनी आता यंत्र घालणे थांबविले आहे.
--------
ठेकेदार न फिरकल्याने बैठक नीरस
महापालिकेत सध्या एलईडी प्रकल्पाची जोरदार चर्चा आहे. तसा हा प्रकल्प साठ कोटींचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने ‘हिशेब’ करीत आहे. निविदेला मान्यतेचा विषय स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. स्थायी सदस्यांची मुदत दोन महिने उरल्याने हा विषय मंजूर करून थोडेफार पदरात पाडून घेण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. अशात ठेकेदारासोबत एका हाॅटेलमध्ये बैठकीचे नियोजन केले होते. साग्रसंगीत बैठक होती; पण ऐनवेळी ठेकेदार आलाच नाही. सांगली महापालिकेत काम करण्याचे म्हणजे काही खरे नाही. वर्क ऑर्डर मिळाल्याशिवाय कुठलाच हिशेब पूर्ण होणार नाही, असा निरोप ठेकेदाराने पाठविल्याची चर्चा आहे. परिणामी स्थायी सदस्यांचा उत्साह काहीसा मावळला.