व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

By हणमंत पाटील | Published: December 15, 2023 10:12 PM2023-12-15T22:12:20+5:302023-12-15T22:13:13+5:30

सागाव येथे कारवाई; संशयित कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील

whale smuggling gang jailed | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

विकास शहा, लोकमत न्यूज नेटवर्क, शिराळा : सागाव (ता. शिराळा) येथे वनविभागाने कारवाई करून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्याकडून ८ ग्रॅम उलटीचा नमुना, पाच मोबाइल, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामागे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

संशयितांनी चार किलोपर्यंत व्हेल माशाची उलटी देऊ, असे सांगितले होते. या उलटीचा एका किलोचा दर १ कोटी रुपयांपर्यंत आहे. या कारवाईत रोहन सर्जेराव पाटील (वय २९, रा. कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), प्रथमेश सुरेश मोरे (वय २३ वर्षे, रा. सोळंबी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), दिग्विजय उत्तम पाटील (वय २४, रा. सागाव, ता. शिराळा), लक्ष्मण सुखदेव सावळे (वय ३४, रा. लातूर सध्या रा. कळंबोली, मुंबई), दत्तात्रय आनंदराव पाटील (वय ४१, रा. बिऊर, ता. शिराळा) यांना अटक केली आहे. न्यायालयासमोर आरोपींना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, व्हेल माशाची उलटी तस्करी करणारी टोळी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागाव येथील पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले. यावेळी संशयित दत्तात्रय पाटील याने बनावट ग्राहकांची भेट घेतली. त्यानंतर व्हेल माशाच्या उलटीचा नमुना दाखविण्यासाठी आणतो म्हणून गेला. अर्ध्या तासाने दत्तात्रय पाटील हा रोहन पाटील, प्रथमेश मोरे, दिग्विजय पाटील, लक्ष्मण सावळे असे पाच जण पेट्रोल पंपावर आले. त्यांनी बॅगेमध्ये असलेला व्हेल माशाची ८ ग्रॅम उल्टी (अंबरग्रीस) दाखवली. यानंतर बनावट ग्राहकाने याबाबत आपली बऱ्याच व्यवहारात फसवणूक झाली आहे. त्यामुळे संपूर्ण मुद्देमाल पाहिल्यावरच व्यवहार करूया, असे सांगितले. तेव्हा संशयितांनी चार किलोपर्यंत माशाची उलटी देऊ शकतो, असे सांगितले.

यावेळी उपस्थित वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांचे समवेत वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, अनिल वाजे, हणमंत पाटील, विशाल डुबल, भिवा कोळेकर, रजनीकांत दरेकर, बाबासाहेब गायकवाड, मोहन सुतार यांनी सापळा रचून संशयित पाच जणांना ताब्यात घेतले. 

रॅकेटची शक्यता-

टोळीने चार किलोपर्यंत उलटी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याची किंमत चार कोटींपेक्षा जास्त असू शकते. यामध्ये मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.
 

Web Title: whale smuggling gang jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.