लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोलीच्या वैभवात भर टाकणारी व पर्यटकांना आकर्षित करणारी चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान वादळी वाऱ्यामुळे कोसळली.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाची जाधववाडी येथील स्वागत कमान दोन वर्षांपूर्वी उभी करण्यात आली होती. त्याच कमानीवर विविध वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. पण त्याचे ओझे कमानीला पेलत नव्हते. शिवाय निकृष्ट बांधकामामुळे वादळी वाऱ्यात कमानीचा टिकाव लागला नाही. मुसळधार पाऊस, जोरदार वादळी वारे यामुळे ही कमान कोसळली आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या व कमानीवर साकारण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतीचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
चांदोली परिसरातील मणदूर, सोनवडे, आरळा,
करुंगली, चरण परिसरातील चांदोलीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे ठिकठिकाणी कोसळली आहेत. आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
विजेचे खांब पडले आहेत, तर काही ठिकाणी वाकले आहेत. तारा तुटल्या असल्याने विद्युत पुरवठा शनिवारी सायंकाळपासून सलग तीन दिवस बंद होता. सोमवारी दुपारी सुरळीत झाला, पण पुन्हा रात्री दहा वाजता सारा परिसर अंधारात गेला.