जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश देऊनही जत शहरात मात्र जत नगरपरिषद व तालुका प्रशासन यांच्या दुर्लक्षाने आठवडा बाजार भरवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील आठवडी बाजार न भरविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. असे असतानाही जत शहरात मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला जत नगर परिषदेने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे मंगळवारी भरविण्यात येत असलेला आठवडी बाजार भरला होता. या आठवडी बाजारात व्यावसाईक व बाजारकरी यांच्याकडून कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. व्यावसायिक, बाजारकरी तसेच मोटारसायकलवरून जा-ये करणारे वाहनचालक तोंडाला मास्क न लावता बाजारभर फिरत होते. पोलीस प्रशासन तर असून नसल्यासारखे वागत होते. कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर ते कोणतीही कारवाई करताना दिसत नव्हते याचीच चर्चा सर्वत्र होत होती. जत शहरात कोरोनाची परिस्थिती आता कुठे आटोक्यात येऊ लागली असतानाच परत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने याला सर्वस्वी जत नगर परिषद व पोलीस प्रशासन हेच जबाबदार आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी जत शहरवासीयांतून होत आहे.
060721\1753-img-20210706-wa0055.jpg
जतमध्ये आठवडी बाजार बंदची पायमल्ली