सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सोमवारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवार, ५ ते मंगळवार ११ मेपर्यंत जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
जिल्ह्यासह महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज १३०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील काही नगरपालिका व तालुक्यांच्या ठिकाणी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातही जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी काही संघटना व नगरसेवकांनी केली होती. याबाबत सोमवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते. या बैठकीत सात दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिका क्षेत्रात दररोज दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या स्थिर असली तरी घट होणे आवश्यक आहे. शहरातील रुग्णालयात आणि होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. उदरनिर्वाह म्हणून भाजी, फळेविक्रेत्यांना परवानगी दिली होती, पण त्यांनी गैरफायदा घेतला. प्रशासनाच्या अंगावर येण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे आता बुधवार, ५ ते मंगळवार ११ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी महापौरांनी चर्चा केली. आमदार, खासदार, इतर पक्ष व सामाजिक संघटनांशी चर्चा सुरू आहे. सर्वांनीच जनता कर्फ्यूचे स्वागत केले आहे, असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.
चौकट
काय बंद, काय सुरू...
या सात दिवसांच्या काळात औषध दुकाने, रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांची दुकाने सुरू राहतील. दूध व्यावसायिकांना सकाळी अकरापर्यंतच परवानगी असेल. पूर्वी किराणा दुकाने व भाजी विक्रेत्यांना सकाळी सात ते अकरापर्यंत व्यवसाय करता येत होता. पण आता दुकाने, रस्त्यावरील विक्री बंद राहील. त्यांना घरपोच सेवेची मुभा राहील. मात्र, त्यांनाही अकरापर्यंतच परवानगी असेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
चौकट
कॉल आल्यानंतर लसीकरणासाठी बाहेर पडा
महापालिका क्षेत्रात १८ व ४५ वर्षांवरील नागरिकांचे स्वतंत्र लसीकरण सुरू आहे. मात्र, लस कमी प्रमाणात येत आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून कॉल करून लसीकरणासाठी बोलावले जाणार आहे. त्यामुळे कॉल आल्यानंतरच लसीकरणासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले.