सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील कोसारी, कुंभारी परिसरात पोहोचले आहे. तो सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांत पुरवण्याचे नियोजन असल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले.
कृष्णेच्या पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची संकल्पना आहे, त्यातून गतवर्षीपासून पावसाळ्यात म्हैसाळ प्रकल्पाचे पंप सुरू करण्यात येत आहेत. यावर्षीही १६ ऑगस्टला पहिल्या टप्प्यातून उपसा सुरू झाला. शनिवारी (दि. २१) पाचव्या टप्प्याचे पंप सुरू झाले. सध्या मुख्य कालवे दुथडी भरून वाहत आहेत. कृष्णेचे पाणी जतसह सांगोला, मंगळवेढा तालुक्यांनाही दिले जाणार आहे. कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले की, या तालुक्यांतील तलाव ५० ते ७० टक्क्यांपर्यंत भरून घेण्याचे नियोजन आहे. पाऊस झालेला नसल्याने तलावांत २० टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा आहे. त्यात कृष्णेचे पाणी सोडले जाईल. परतीच्या पावसाने ते पूर्ण भरतील अशी अपेक्षा आहे. काही महत्त्वाच्या नाल्यांमध्येही पाणी सोडले जाईल.
सध्या शेतीसाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे शेतापर्यंत जाणाऱ्या छोट्या वितरिकांमध्ये पाणी सोडले जाणार नाही. फक्त तलावांना प्राधान्य दिले जाईल. नदीतील पाणीसाठा आणि परतीचा पाऊस याचा अंदाज घेऊन आवर्तनाचा कालावधी ठरविला जाणार आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेंभू व म्हैसाळ योजना सुरू करण्याचे आदेश एकाचवेळी दिले होते.