सांगली : सांगली व कुपवाड शहरांवर पाणी कपातीचे संकट असून, पाणीपुरवठा विभागाने दहा टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे दिला आहे. याबाबत शुक्रवारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. येत्या आठवडाभरात पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सांगली व कुपवाड या दोन शहरांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो, तर मिरज शहराला कृष्णा नदीबरोबरच वारणा नदीचे पाणी मिळते. त्यामुळे सांगलीला कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यावरच कायमस्वरुपी अवलंबून रहावे लागते. दरवर्षी या काळात कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने, पाणी टंचाईची वेळ महापालिकेवर कधी आली नव्हती. पण यंदा मात्र परिस्थिती बिकट आहे. जून महिन्यापासूनच पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली. त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला असून, जिल्ह्यात दुष्काळाचे सावट तीव्र होत आहे. त्यातच आता शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. सध्या कोयना धरणात ८०. ३१ टीएमसी पाणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्याचा परिणाम थेट शहरावर होणार आहे. त्यात पावसाची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. महापालिकेकडून दररोज ९० एमएलडी (दशलक्ष घनमीटर) पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील ७० एमएलडी पाणी ग्राहकांपर्यंत पोहोचविले जात असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दुष्काळी स्थिती, पावसाचे कमी झालेले प्रमाण पाहता महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तसा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. आयुक्त कारचे यांनीही पाणीपुरवठ्यासंदर्भातील माहिती संकलित केली आहे. सुरुवातीला अधिकाऱ्यांशी नंतर पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)चर्चा करूनच निर्णय : अजिज कारचेपावसाचे प्रमाण कमी झाले असून, धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व ती माहिती संकलित केली आहे. उद्या शुक्रवारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती अवगत करून कपातीचा निर्णय जाहीर करू, असे आयुक्त कारचे यांनी सांगितले.
आठवड्याभरात पाणी कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 23:30 IST