सांगली : गेल्या आठवड्यात ‘स्वाइन फ्लू’संशयित म्हणून दाखल झाल्यानंतर मृत झालेल्या दोन रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. चार दिवसांपूर्वी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यास, ‘स्वाइन’च्या मृतांची संख्या २२ होणार आहे. दरम्यान, सध्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात स्वाइनची लागण झालेल्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गेल्या आठवडाभरात ४० संशयित आढळून आले होते. हे संशयित रुग्ण सांगली, मिरज, कुपवाड, इस्लामपूर, वाळवा, जत, याशिवाय कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील होते. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. यातील पंधरा रुग्णांना स्वाइनची लागण झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले होते. गेल्या चार दिवसात कुपवाड व संजयनगर येथील एका महिलेसह दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला होता. ते दाखल झाल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. पण तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. सध्या स्वाइनची लागण झालेल्या दोन रुग्णांवर स्वाइन कक्षात उपचार सुरू आहेत. गेल्या नऊ महिन्यात तब्बल २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व रुग्णांना स्वाइनची लागण झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाइन जिल्ह्यात वेगाने वाढला आहे. तो पूर्ण ताकदीने पसरला असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन दिवसात पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वाइनचा आणखी फैलाव होऊ शकतो, असेही काही डॉक्टरांनी सांगितले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना तोडाला रुमाल किंवा मास्क वापरावा. सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे दिसून आल्यास तातडीने औषधोपचार करून घ्यावेत. यातूनही प्रकृती ठीक न झाल्यास स्वाइन फ्लूची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन स्वाइन फ्लू कक्ष अधिकारी सदाशिव व्हण्णणावर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)तोंडाला मास्कआठवडाभरात ‘स्वाइन फ्लू’ने महापालिका क्षेत्रात दहाजणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. दररोज तीन-चार संशयित नव्याने दाखल होत आहेत. यातील एक-दोघांना स्वाइनची लागण होत असल्याचा अहवाल येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत. पण रुग्णालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविली जात नाही. प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
मृत रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा
By admin | Updated: October 5, 2015 00:09 IST