लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील राम व हनुमान मंदिरांमधील रामनवमीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे खंडित झाली आहे. अडीचशे ते तीनशे वर्षांपासूनची रामनवमीची जुनी परंपरा जिल्ह्याला लाभली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाविकांना देवापासून दूर राहावे लागत आहे.
सांगलीतील राम मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, मारुती मंदिर येथील सर्व सार्वजनिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत. माधवनगर व मिरजेतही रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची पंरपरा आहे. त्याठिकाणच्या मंदिर व मठांमधील कार्यक्रम रद्द केले आहेत. शेकडो वर्षांची अखंडित परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचमुखी मारुती मंदिरातील उत्सवही सलग दुसऱ्या वर्षी रद्द केला आहे. येथे प्रतिवर्षी चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती असे सलग कार्यक्रम होत असतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून येथील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. ठरलेल्या वेळेत श्री राम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सव मंदिरात फक्त पुजारी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्येही केवळ पुजारीच जन्मकाळ, नित्यपूजा असे कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच भाविकांविना जन्मकाळ व उत्सव होणार आहे.
चौकट
हनुमान जयंतीचे कार्यक्रमही रद्द होणार
संचारबंदीचा काळ एप्रिलच्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे याच काळात येणाऱ्या हनुमान जयंतीचे कार्यक्रमही रद्द केले जाणार आहेत. जिल्ह्यात हनुमान मंदिरांची संख्या मोठी असल्याने हा उत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो; पण यावेळी भाविकांविना जन्मकाळ साजरा होणार आहे.