कुपवाड : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील व्यावसायिकांवर महापालिका आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २४ हजारांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कुपवाड शहर प्रभाग समिती तीनमधील वाॅर्ड नंबर एक, दोन व आठ या तीन वाॅर्डात जिल्हा प्रशासनाने दुकानदार, व्यावसायिकांना दिलेल्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवून शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुपवाड महापालिका प्रशासनाने त्यांच्याकडून २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे, लिपिक प्रज्ञावंत कांबळे यांनी भाग घेतला होता.