तासगाव : येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाने तालुक्यातील सहा गावे दत्तक घेत 'माझं गाव कोरोनामुक्त गाव ' या अभियानास नुकताच प्रारंभ केला, असे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी सांगितले.
तालुक्यातील सावर्डे, चिंचणी, वासुंबे, कवठेएकंद, बलगवडे आणि बोरगाव या सहा गावांमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने कोरोनाविषयी जाणीवजागृती आणि प्रबोधनाचे काम सुरू झाले आहे. गावांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होईपर्यंत या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक काम करणार आहेत. प्रा. डॉ. तातोबा बदामे, प्रा. डॉ. अमोल सोनवले, प्रा डॉ. पवन तेली, प्रा. आण्णासाहेब बागल, प्रा. डॉ. हाजी नदाफ, प्रा. डॉ. मेघा पाटील, प्रा. साईनाथ घोगरे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अजिंक्य माने आणि आरती कणसे यांची कोविड योद्धा समिती स्थापन केली असून, दत्तक घेतलेल्या प्रत्येक गावाचे स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले आहेत. या गावांमध्ये लवकरच सरपंचांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीही गठित केली जाणार आहे.