लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेले सहा महिने सांगलीकरांना लस टोचून कोरोनापासून संरक्षण दिलेले लसटोचक कर्मचारी सध्या मात्र रोजगाराविना फिरत आहेत. शिवाय त्यांचे एका महिन्याचे मानधनही थकले आहे. नोकरी गेली आणि मानधनही नाही अशी त्यांची केविलवाणी स्थिती आहे.
गेल्या जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण सुरू झाले. लाभार्थ्यांचा खूपच प्रतिसाद मिळाला, त्यामुळे लसीकरणामध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची कामगिरी जिल्ह्याने केली. प्रतिसाद पाहून लसींचा पुरवठाही वाढला. लाभार्थ्यांना लस देण्यासाठी जिल्हाभरात १४७ लसटोचक जिल्हा परिषदेने नियुक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांची कंत्राटी नियुक्ती केली होती. पहिली लाट ओसरताच डिसेंबरमध्ये त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. १ एप्रिलपासून जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झाली, त्यामुळे पुन्हा १ मेपासून लसटोचकांना नियुक्त्या देण्यात आल्या. सुरुवातीला दोन महिन्यांची नियुक्ती होती; पण लाट ओसरण्याची चिन्हे नसल्याने ३० जूनअखेर नियुक्त्या वाढविण्यात आल्या. जिल्ह्यात सुमारे ५५० कर्मचारी कंत्राटी स्वरूपात घेतले होते. त्यामध्ये डॉक्टर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, परिचारिका, अैाषध निर्माता, फिजिशियन, रुग्णवाहिका चालक आदींचा समावेश होता. त्यातील १४७ लसटोचकांना ३० जून रोजी कार्यमुक्त करण्यात आले. पण, त्यांना शेवटच्या महिन्याचे मानधन देण्यात आलेले नाही. अर्थात, त्यांना पुन्हा नियुक्त करण्याच्या हालचालीही प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत.
बॉक्स
सध्या काम नाही, केलेल्या कामाचा मोबदलाही नाही
लसटोचकांना महिन्याला सरासरी १५ हजार रुपये मानधन मिळायचे. ज्या दिवशी लस येईल, त्याच दिवशी काम आणि मानधन असे स्वरूप होते. ३० जूनपासून त्यांना कार्यमुक्त केल्याने रोजगार गेला आहे. शिवाय शेवटच्या महिन्याचे मानधनही हातात पडलेले नाही. लसटोचकांच्या वेतनासाठी ३८ लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्याला मिळाले होते, ते संपले आहे. आता महिन्याभराच्या वेतनासाठी स्वतंत्र तरतूद मागवावी लागेल.
बॉक्स
अन्य काही जणांचे मानधनही त्रुटींमुळे अडकले
- डॉक्टर्स, क्ष किरण तंत्रज्ञ, परिचारिका, अैाषध निर्माता, फिजिशियन, रुग्णवाहिका चालक यांनाही कंत्राटी स्वरूपात मानधन मिळते.
- या सर्वांचे मानधन प्रत्येक महिन्याला जिल्हा परिषदेकडून दिले जाते, पण काहींचे मानधन कागदोपत्री त्रुटींमुळे रखडले आहे.
- काही कर्मचाऱ्यांच्या बँक कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत, तर काहींनी अन्य आवश्यक तपशील सादर केलेला नाही.
- अन्य सहकारी कर्मचाऱ्यांचे मानधन मिळते, मग आपले का रखडले? अशी शंका त्यांना सतावत आहे.
पॉइंटर्स
कोरोनाकाळात मानधनावर घेतलेले कर्मचारी ५५०
सध्या कामावर असलेले कर्मचारी ४०३
किती कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा १४७
सध्या सुरू असणारी कोविड सेंटर्स ३७०
कोट
नोकरीत घ्या, मानधनही द्या
पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केले. त्याचे मानधनही वेळेत मिळाले. लाट ओसरताच नियुक्त्या थांबल्या. शेवटच्या एका महिन्याचे मानधन मिळालेले नाही.
- रवींद्र चव्हाण, कंत्राटी कर्मचारी
पूर्ण कोरोनाकाळात शासकीय सेवेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केले आहे. शासकीय कार्यशैलीचा चांगला अनुभव आला आहे. शैक्षणिक पात्रताही आहे. या स्थितीत कार्यमुक्त न करता सेवेत कायम ठेवावे, वेतनाविषयी तक्रार नाही.
- मनीषा कांबळे, कंत्राटी कर्मचारी
कोरोनाकाळात मानधन वेळेत मिळाले. आता सेवा संपली असली तरी शेवटचे मानधन थांबले आहे. तेदेखील काही दिवसांत मिळेल, असे सांगण्यात आले आहे. नव्याने पुन्हा नियुक्तीची अपेक्षा आहे.
- कंत्राटी लसटोचक.
कोरोनाकाळातील कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याचे मानधन थकीत नाही. लसटोचकांनाही वेळेत दिले आहे. त्यांना नुकतेच कार्यमुक्त केले असून, शेवटच्या एका महिन्याचे मानधन प्रलंबित आहे. तेदेखील लवकरच दिले जाईल. कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनाही वाढीव मानधन मिळणार आहे.
- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.