लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आयर्विन पुलावरील वाहतूक महिनाभरासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीवाडी आणि पश्चिम भागातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. हा पूल दुचाकीसाठी सकाळी व सायंकाळी सुरू करावा, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली. याला सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्वत: मंजुरी दिली असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
आयर्विन पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्यामुळे महिनाभरासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बायपास रोडवरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यावर दोन-दोन तास वाहतूक ठप्प होत आहे. सांगलीवाडी व पश्चिम भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. याबाबत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, शाखा अभियंता शमशुद्दीन मुजावर, उपअभियंता अमर नलावडे यांच्यासह कामाची पाहणी केली. सकाळच्या सत्रात सहा ते दहा आणि सायंकाळी सहानंतर दुचाकी वाहतुकीसाठी हा पूल खुला ठेवावा, अशी मागणी केली.
यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तत्वत: मान्यता दिली. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पाटील, पोलीस पाटील महाबळेश्वर चौगुले, शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर पाटील, धनंजय पाटील, आनंदराव पाटील, भरत तांबेकर, विशाल पाटील, संग्राम पाटील, शिवाजी यादव, नितीन मोहिते, गणेश पाटील, युवराज पाटील, घोंगडे आदी उपस्थित होते.