लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील गणपती मंदिर, फळ मार्केट परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. प्रथमेश गजानन एडके (वय २१, रा. हनुमाननगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथमेश एडके हा वसंतदादा मार्केट यार्ड येथील मंगल कार्यालयाजवळ चोरीतील मोटारसायकल विक्रीसाठी थांबला होता. याची माहिती खास बातमीदारांकडून पोलीस काॅन्स्टेबल विशाल कोळी यांना मिळाली. त्यांनी एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना चोरट्याची माहिती दिली. सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने तातडीने मार्केट यार्डात धाव घेत, प्रथमेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटारसायकलीबाबत चौकशी केली असता, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने ही मोटारसायकल महिन्यापूर्वी गणपती मंदिर परिसरातून चोरल्याची कबुली दिली, तसेच विष्णुअण्णा फळ मार्केटमधून दोन मोटारसायकली चोरल्याचेही सांगितले. पोलिसांनी या तीनही मोटारसायकली जप्त केल्या आहेत. संशयित प्रथमेश याला विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.