इस्लामपूर : शहरातील समतानगर परिसरात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर बसलेल्या मुलीसह वृद्धाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली. मुलीस तीन ते चार ठिकाणी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. या दोघांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गौरी अमर फाळके (१२) आणि प्रकाश कांबळे (७०, दोघे रा. समतानगर, इस्लामपूर) अशी जखमींची नावे आहेत. या परिसरात १० ते १२ कुत्र्यांच्या टोळक्याने उच्छाद मांडला आहे. येथील नागरिक, महिला, मुली, लहान मुले कुत्र्यांच्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. पालिका प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही.
गुरुवारी रात्री गौरी घराच्या पायरीवर बसली होती. त्यावेळी अंधारातून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला करत चावे घेतले. तिच्या मानेवर, पाठीवर आणि पायावर चावे घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर पुढे चालत निघालेल्या प्रकाश कांबळे यांच्या पायाच्या टाचेजवळ या कुत्र्याने जोराचा चावा घेतला. या दोघांच्या किंचाळण्याने परिसरातील नागरिक बाहेर पडले. त्यांनी या कुत्र्याला पाठलाग करून पिटाळून लावले.
जखमी अवस्थेमधील दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र येथे कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने दोघांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
फोटो-