पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास आनंदराव चव्हाण ये अहिल्यानगर ते संपत चौक रोडने चालत जात होते. याचवेळी संशयित तिथे आले व त्यांना लिफ्ट दिली. त्यांना सांगलीच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या भारत स्टील कारखान्याजवळ नेत त्यांना दुचाकीवरून उतरवून चव्हाण यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन काढून ते पळून गेले होते. अचानक घडलेल्या या प्रकाराने चव्हाण भयभीत झाले होते. त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली.
संजयनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, माधवनगर-अहिल्यानगर मार्गावर दोघे थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता चेन मिळून आली. यावेळी त्यांनी एका वृद्धाच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीची चेन आणि मोटारसायकल जप्त केली.
वृद्धाला जबरदस्तीने लुटणाऱ्यांना अवघ्या काही तासांत पोलिसांनी जेरबंद केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.