इस्लामपूर : शहरातील हनुमाननगर परिसरात किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीतून दोन कुटुंबीयांमध्ये मारामारी झाली. या घटनेत चौघे जखमी झाले. हा प्रकार बुधवारी रात्री ९ च्या सुुमारास समाजमंदिरासमोर घडला. याबाबत दोन्ही कुटुंबांनी पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.
सुभाष विलास भिंगार्डे (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीत भगवान तानाजी जाधव, अर्जुन तानाजी जाधव, विक्रम संजय जाधव, उत्तम बबन जाधव, अजय धोंडीराम जाधव, सुरेश धोंडीराम जाधव, राम बापू जाधव, बाळू बापू जाधव (सर्व रा. हनुमाननगर) या नऊ जणांनी मिळून काठीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. यामध्ये सुभाष भिंगार्डे आणि रणधीर सुभाष भिंगार्डे हे दोघे जखमी झाले आहेत. विलास भिंगार्डे हे शेजाऱ्यांशी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी झालेल्या वादावादीतून भगवान व अर्जुन यांनी सुभाषच्या उजव्या पायावर, पाठीवर, काठीने मारहाण करत जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
अजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांचे चुलते बापू व्यंकू जाधव (वय ६०) हे समाज मंदिरासमोर बोलत बसले होते. त्यावेळी तेथे वाद सुरू झाला. अजय जाधव आणि त्याचा भाऊ भगवान जाधव हे तिथे लोकांना वाद करू नका असे सांगत असताना रणधीर भिंगार्डे, सुभाष भिंगार्डे यांनी काठीने मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे.