सांगली : कुमठे फाट्याजवळ तरुणास अडवून कोयत्याच्या धाकाने उसात ओढत नेत लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केली. सोनल साहेबराव रसाळ (वय १८, रा. रामवाडी झोपडपट्टी, पुणे) आणि बबलू संतोष चव्हाण (२०, रा. लोहगाव, पुणे) अशी संशयितांची नावे असून एका महिलेच्या सांगण्यावरून त्यांनी तरुणास लुटल्याची माहिती पोलिसांना दिली.
रोहन पांडुरंग पाटील (रा. उत्कर्षनगर, कुपवाड रोड, सांगली) या तरुणास २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुमठे फाट्याजवळ गाडी आडवी लावून अडवत कोयत्याने धाक दाखवून लुटण्यात आले होते. यात रोहनकडील एटीएम कार्ड, अंगठी व पैसे काढून घेण्यात आले होते. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद होती. एलसीबीचे पथक याचा तपास करत असताना, पुणे येथील दोघांनी ही लुटमार केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पुण्यातील गुंजन टॉकीज चौकात जाऊन दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी आमच्या ओळखीच्या व रोहनचीही ओळख असलेल्या एका महिलेनेच आमच्याशी संपर्क साधून त्यास अडवून पैसे काढून घेण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यास अडवून २० हजार रुपये काढून घेतल्याची माहिती दिली. संशयितांकडून सोन्याच्या अंगठीसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.