स्ट्रॉबेरी महोत्सवाला बारा हजार पर्यटकांची भेट !

By admin | Published: April 16, 2017 10:43 PM2017-04-16T22:43:48+5:302017-04-16T22:43:48+5:30

शानदार समारोप : कधीही या अन् पोटभर खा... भिलारचे मळे फुलले माणसांनी

Twelve tourists visit the Strawberry Festival! | स्ट्रॉबेरी महोत्सवाला बारा हजार पर्यटकांची भेट !

स्ट्रॉबेरी महोत्सवाला बारा हजार पर्यटकांची भेट !

Next



महाबळेश्वर : तालुक्यातील भिलार येथे गेली तीन दिवस सुरू असलेल्या स्ट्रॉबेरी महोत्सवाचा रविवारी शानदार समारोप झाला. या महोत्सवाच्या निमित्ताने सुमारे बारा हजारांहून अधिक पर्यटकांनी रानवाटा धुंडाळून थेट शेतातील स्ट्रॉबेरीची चव चाखली.
भिलार येथील महोत्सवाला पुणे, मुंबई, नागपूर, सातारा तसेच गुजरात, सूरत, पंजाब तसेच परदेशातीलही पर्यटकांनी भेटी दिल्या. स्ट्रॉबेरी मनसोक्त खाण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या स्वागतासाठी व शेतावर घेऊन जाऊन त्यांना माहिती देण्यासाठी भिलार येथील शेतकरी तीन दिवस दिमतीला होते.
स्ट्रॉबेरी महोत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष असून, पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादाने आयोजकांचा हेतू साध्य होताना दिसत आहे. यानिमित्ताने विविध उद्योग व्यवसायांना गती मिळाली आहे. स्ट्रॉबेरीबरोबरच येथील शेतीची तसेच इतर पिकांची माहिती पर्यटक घेताना कुतूहलाने ती खरेदीही करीत आहेत. विविध ठिकाणांच्या मुलांच्या सहलीही महोत्सवात काढल्या होत्या.
सांगताप्रसंगी बाळासाहेब भिलारे म्हणाले, ‘भिलारच्या स्ट्रॉबेरीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच ‘जी-आय’ मानांकन मिळाले आहे. जागतिक बाजारपेठेत स्ट्रॉबेरीची मोहर उमटल्याने अशा प्रकारचा महोत्सव भरवण्यास आमचा उत्साह आणखी दुणावला आहे.’
कृषीतज्ज्ञ संतोष रांजणे म्हणाले, ‘महोत्सवाला मिळत असणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शेतकऱ्यांमध्येही उत्साह ओसंडून वाहत आहे. याचा फायदा प्रत्यक्षात दिसत असून, यातूनच गतवर्षी तालुक्यात २५०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली होती.’
यावेळी गणपत पार्टे, सहायक पोलिस निरीक्षक नारायणराव पवार, प्रवीण भिलारे, प्रशांत भिलारे, बाबूराव भिलारे, नितीन भिलारे, शिवाजी भिलारे, प्रकाश भिलारे, जतीन भिलारे, प्रकाश गावडे, संतोष वाडकर, सुरेश भिलारे, वसंत भिलारे आदी उपस्थित होते. नितीन भिलारे यांनी सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Twelve tourists visit the Strawberry Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.