ओळ : बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील स्टोनक्रशर बंद करावे, या मागणीसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे सुरू असणारे बालाजी स्टोनक्रशर बंद करावे, नव्याने प्रस्तावित जगदंब स्टोनक्रशरला परवानगी देऊ नये, या मागणीसाठी मंगळवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार बी. जे. गोरे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बनेवाडी येथे बालाजी स्टोनक्रशर गट नं. ४२४ मध्ये सुरू आहे. या स्टोनक्रशरला ज्या अटी-शर्तीवर ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती, त्या अटी-शर्तीचे पालन होत नाही. याबाबत दोनवेऴा शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता हे स्टोनक्रशर बंद करावे. तसेच बनेवाडी येथील गट नं. ४२४ मध्ये जगदंब स्टोनक्रशरला नवीन परवानगी देण्यात आली आहे. या स्टोनक्रशरमुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसा धुळीचादेखील प्रादुर्भाव होणार आहे. परिसरातील विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याचा प्रश्र निर्माण होणार आहे. त्यामुळे या स्टाेनक्रशरला परवानगी देऊ नये. जोपर्यंत याबाबत ठोस निर्णय हाेत नाही, तोपर्यंत बेमुदत सुरू राहील.
उपसरपंच सुमित जगताप, अजित शिंदे, हेमंत शिंदे, सागर जगताप, राजकुमार पाचुंद्रे, अनिकेत डुबुले, अशोक बागले, वैभव शिंदे, आनंदा शिंदे, रविराज जगताप, श्रीकांत शिंदे, दशरथ शिंदे, गोरखनाथ शिंदे आदी उपाेषणात सहभागी झाले आहेत.
चौकट
विविध पक्षांचा आंदाेलनास पाठिंबा
उपोषणास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती पवार, आरपीआयचे लालासाहेब वाघमारे, रवी चंदनशिवे यांनी पाठिंबा दिला आहे.