२४ मार्च हा दिवस 'जागतिक क्षयरोग दिन' म्हणून जगभर पाळला जातो .
गेल्यावर्षी २३ मार्च या रोजी लाॅकडाऊन जाहीर झाला आणि अर्थातच सारे जीवन 'कोरोना' मय झाले. कोरोनाशिवाय इतरही आजार असतात, त्यामुळे लोक आजारी पडतात, त्यामुळे त्रास होतो, त्यासाठी औषधे घ्यावी लागतात. याचा काहीअंशी विसर पडलाय की काय, अशी परिस्थिती गेले वर्षभर निर्माण झाली.
क्षयरोग हा थोडासा दुर्लक्ष झालेला एक महत्त्वाचा संसर्गजन्य रोग.
मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्यूलोसिस नावाच्या जीवाणुंमुळे मुख्यत्वेकरून फुप्फुसाला होणारा आणि हवेमधून पसरणारा आजार. नखे, केस आणि दात सोडून सांधे, मणका, मेंदू, त्वचा अशा कोणत्याही अवयवांना होणारा हा आजार, वयाच्या कोणत्याही टप्प्यात आणि कुणालाही होऊ शकतो.
एका बाजूला, कोरोनाच्या भीतीपोटी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि हात धुणे या दक्षतेच्या बाबी पाळल्यामुळे क्षयरोगाचा प्रसार काही अंशी कमी व्हायला हवा, पण दुसऱ्या बाजूला इतर अनेक कारणांमुळे क्षयरोगाकडे दुर्लक्ष होते की काय असे वाटू लागले आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण दवाखान्याला किंवा हॉस्पिटलमध्ये जाणे टाळत होते. ज्यांना क्षयरोगाची लक्षणे होती, उदा . संध्याकाळचा ताप, भूक न लागणे, खोकला येणे, धाप लागणे, अशक्तपणा येणे, वजन कमी होणे किंवा खोकल्यातून बेडका किंवा रक्त पडणे अशा तक्रारींकडे काही अंशी दुर्लक्ष केले, तात्पुरते औषधे घेतली. ज्यांना आधीपासूनच क्षयरोगाचा त्रास होता, त्यांनी कोरोनाच्या भीतीने पुढच्या औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणे टाळले, अशांचाही क्षयरोग बळावला.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजही जगभरात क्षयरोगामुळे दररोज चार हजार लोक मृत्युमुखी पडतात, तर दररोज २८ हजार जणांना क्षयाची नव्याने बाधा होते. ज्या व्यक्तीच्या थुंकीत क्षयाचे जंतू आहेत, अशा व्यक्तीने आरोग्यदायी सूचनांचे पालन केले नाही जसे की, कुठेही थुंकणे शिंकणे, वेळेवर औषधोपचार न घेणे, तब्येतीकडे दुर्लक्ष करणे अशा वर्तणुकीमुळे अशी एक व्यक्ती वर्षभरात नवीन पंधरा निरोगी व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसाद देऊ शकते, ही गंभीर बाब लक्षात घ्यायला हवी.
क्षयरोग दिनानिमित्तचे जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षीचे घोषवाक्य आहे , ' The clock is clicking ' म्हणजेच ' टिकटिक सुरू आहे.' याचा अर्थ प्रत्येक सेकंदागणिक क्षयाचा धोका वाढत आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वांनी क्षयरोग निर्मूलनासाठी प्रयत्न करायला हवा.