फोटो ओळ-- कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याच्या मध्यभागी मोठी झाडेझुडपे अडकली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : नुकत्याच आलेल्या वेगवान पाण्यामुळे कृष्णा नदीवरील डिग्रज बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झाडे, लाकडी ओंडकी, गवत अडकले आहे. त्याचा मोठा दाब बंधाऱ्याच्या भिंतीवर पडत असल्याने धोका निर्माण झाला आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असून, अद्याप कोणीही याबाबत कार्यवाही केली नाही.
गेले चार ते पाच दिवस मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. येरळा नदीसह परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी कृष्णा नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे कसबे डिग्रज बंधारा पाण्याखाली गेला होता. सध्या थोडी पाणीपातळी कमी झाल्याने बंधारा उघडा झाला आहे.
पण नदीपात्रातून वाहून आलेली मोठी झाडे, ओंडकी, गवत, आदी मोठ्या प्रमाणात बंधाऱ्याच्या भागात अडकले आहे. त्याचा दाब बंधाऱ्याच्या पिलरवर पडत आहे. अगोदरच बंधाऱ्याच्या काही ठिकाणी महापुरामुळे नुकसान झाले आहे. आता पुन्हा या झाडाझुडपांमुळे धोका वाढला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तत्काळ ही झाडेझुडपे काढून बंधारा मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.