सांगली: नमस्कार, चला, आपण सोबतच जाऊ असे आश्वासित करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्नुषा व लोकसभेचे इच्छुक विशाल पाटील यांच्या मातोश्री शैलजा पाटील यांची भेट घेतली. पण हा प्रवास राजकीय की अन्य कोणता? याचा खल कार्यकर्त्यांत रंगला.
उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे गुरुवारी सायंकाळी जनसंवाद मेळाव्याअंतर्गत जाहीर सभेसाठी मिरजेत आले. तत्पूर्वी त्यांनी सांगलीत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. त्यावेळी शैलजा पाटील तेथे उपस्थित होत्या. सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेल्या महिन्याभरापासून कॉंग्रेस आणि शिवसेनेत तगडा संघर्ष सुरु आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेने तिढा निर्माण केल्याची चित्र आहे. युतीमध्ये बेबनाव होतो काय? अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी एकतर्फी घोषित केल्याने कॉंग्रेसमधील अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. काॅंग्रेसनेते दिल्ली आणि मुंबईत ठिय्या मारुन आहेत.
याच अस्वस्थतेच्या वातावरणात उद्धव ठाकरे मिरजेतील सभेसाठी गुरुवारी सायंकाळी सांगलीत आले. वसंतदादांच्या समाधीस्थळी अभिवादनावेळी शैलजा पाटील यांच्यासह माजी नगरसेवक मनोज सरगर उपस्थित होते. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी काॅंग्रेसजनांकडून ठाकरे यांच्याकडे आग्रह केला जाईल अशी अपेक्षा होती, पण या विषयावर कोणीही बोलले नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना शैलजा पाटील यांची ओळख करुन दिली. त्यावेळी ठाकरे यांनी त्यांना नमस्कार केला, म्हणाले, आपण सोबतच जाऊ.
ठाकरे यांच्या या वक्तव्याचा अर्थ मिरजेकडे प्रवास असा होता? की राजकीय प्रवास ? याचा खल कार्यकर्त्यांमध्ये रंगला. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, बजरंग पाटील, अभिजित पाटील, दिगंबर जाधव, शंभूराज काटकर, हेदेखील उपस्थित होते.
हा कोणता वृक्ष?उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्राणीप्रेम, निसर्गप्रेम सर्वश्रूत आहे. तेजस ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने सरीसृपांच्या अनेक नवनव्या जातींचा शोध लावला आहे. आज वडिलांसोबत तेदेखील सांगलीत समाधीस्थळी आले होते. नदीकाठच्या या परिसरात गर्द वृक्षराजी आहे. त्यातीलच एका शेंगांनी लगडलेल्या वृक्षाने उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. हा कोणता वृक्ष? असा प्रश्न त्यांनी तेजस यांना विचारला. त्यावर तेजस यांचे उत्तर मात्र समजले नाही.