लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. सामाजिक अंतर व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन या अटी घातल्या होत्या. परंतु, जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत व शहरातील वित्तीय संस्थांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस प्रशासन व नगर परिषद यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे.
जत शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत किराणा दुकान, बेकरी, शेती उपयोगी साहित्य, कृषी सेवा केंद्रे, चिकन, मटण व मासे विक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने हे आदेश देतानाच सामाजिक अंतर, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन या अटी घातल्या होत्या. जत शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे.
शहरात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असतानाही शहरातून मास्क न लावता दुचाकी व चारचाकी वाहनातून बिनकामाच्या फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन कारवाई करताना दिसत नाही.
त्याबरोबर अत्यावश्यक सेवेत नसलेली व सकाळी अकरा वाजेपर्यंत वेळेची मर्यादा दिलेली दुकाने व आस्थापना या वेळेनंतरही सुरूच आहेत. या आस्थापना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत असतानाही नगर परिषद व पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.
चौकट
कोरोना पुन्हा वाढू शकतो
जत शहरातील कोराेनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले नाहीत तर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. म्हूणनच व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही बाहेर फिरताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाकडे दुर्लक्ष करणे खूप महागात पडू शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.