कणकवली : वापरात नसलेल्या आणि धूळखात पडलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन संकुलाला आता नवी झळाळी मिळणार आहे. या संकुलाच्या नूतनीकरणासाठी ८० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून सध्याच्या संकुलाच्या दुरूस्तीसह पहिल्या मजल्यावर खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. कणकवली शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे पर्यटन संकुल पर्यटकांपासून लांबच राहिले आहे. त्यावेळी नगरपालिकांना मिळालेल्या कोकण पॅकेजच्या निधीतून कणकवली नगरपंचायतीचे हे पर्यटन संकुल नरडवे मार्गावर मुडेश्वर मैदानानजीक सुमारे आठ वर्षांपूर्वी उभे राहिले. या पर्यटन संकुलात राहण्याऱ्या पर्यटकांसाठी खोल्या आणि स्वयंपाक घर असा त्याचा आराखडा होता. पर्यटन संकुलाच्या आजूबाजूला झाडांची लागवड करून चांगले लॉनही तयार केले होते. मात्र, उभारणी झाल्यापासून या पर्यटन संकुलाला पर्यटकांचे दर्शन झाले नाही. पर्यटन संकुलाचे आणि तेथील खानपानाची व्यवस्था चालवण्यासाठी असणारे भाडे परवडणारे नसल्याचे कारण देत कोणी पुढे आले नाही. खानपानाची सोय नसल्याने शहरापासून लांब असलेल्या या पर्यटन संकुलाकडे कोणी फिरकले नाहीत. आता नगरपंचायतीने या पर्यटन संकुलाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन संकुलाच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. राहण्यासाठी वातानुुकूलित खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी तब्बल ८० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मात्र, यामुळे पर्यटक येथे वळतील का? असा प्रश्न काही नगरसेवकांनी विचारला आहे. मूळात शहरापासून दूर असल्याने येथे राहण्यासाठी कोणी तयार होत नाहीत. शहरात राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि लॉज असताना दूर अंतरावर असलेल्या या पर्यटन संकुलात राहण्यास कोणी तयार होईल का? असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे. पर्यटन संकुल बांधल्यापासून विनावापर राहिले आहे. संकुलातील रेस्टॉरंट चालवणे परवडणारे नसल्याने कोणी ते चालवण्यास घेत नाही. त्यामुळे पर्यटन संकुलावर लाखो रूपये खर्च करूनही त्याची दुरवस्था झाली असल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी दिली. आठ वर्षापूर्वी हे पर्यटन संकुल सुरू झाले तेव्हा ते चालवण्यासाठी साधारण २६ हजार रूपये शुल्क होते. त्यावेळी ते परवडणारे नसल्याने कोणी चालवण्यास पुढे आलेले नव्हते. साहजिकच खानपानाची व्यवस्था नसल्याने कोणी तेथे राहण्यासाठी येण्यास तयार होतील का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
पर्यटन संकुलाला मिळणार नवी झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2015 00:23 IST