सांगली : महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत उद्या सोमवारी दुपारी तीन वाजता संपणार आहे. आतापर्यंत ४३ हरकती दाखल झाल्या असून, रविवारी दोन हरकती आल्या. या हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यावर हरकती व सूचनांसाठी १५ सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत कुपवाडमधून सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत. प्रभाग २, ३ व ८ या तीन प्रभागांबाबत तक्रारी अधिक आहेत. प्रभाग दोनमधील काही भाग तीनमध्ये, तर तीनमधील काही भाग दोनमध्ये जोडला आहे. त्यात कुपवाड गावठाणचा भाग प्रभाग दोनमधून थेट प्रभाग आठमध्ये जोडला आहे. त्याला नागरिकांनी हरकत घेतली आहे. सांगलीतील प्रभाग १६ व १५ बाबतही काही हरकती दाखल आहेत.आजअखेर ४३ तक्रारी दाखल झाल्या. या हरकतींवर १६ ते २२दरम्यान सुनावणी होणार आहे. त्यानंतर प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सांगली महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकतींचा आज शेवटचा दिवस, आजअखेर किती तक्रारी दाखल झाल्या.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:57 IST