लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे मोटरचोरी करून ती सांगलीत विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. विठ्ठल शिवाजी खुर्द (वय ४०) व आकाश दिलीप सादरे, सौरभ सुनील कुरणे व करण बापू कुरणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील करण हा पसार असून इतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेल्या चोरी, घरफोडीच्या घटना लक्षात घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सांगली शहरात गस्तीवर असताना, पथकातील चेतन महाजन यांना माहिती मिळाली की आमराई ते पटेल चौक रोडवर दोघे जण दुचाकीवर सबमर्सिबल पंप विकण्यासाठी घेऊन थांबले आहेत. त्यानुसार जाऊन चौकशी केली असता, २० दिवसांपूर्वी गावातील प्रवीण पाटील यांच्या विहिरीवर असलेली मोटर सौरभ व करण यानी चोरल्याचे सांगितले. संशयितांकडून दुचाकीसह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज रूपनर, अरुण औताडे, नीलेश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.