लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य शासनाने निकृष्ट दर्जाचे दिलेले मोबाईल परत घेऊन दर्जेदार मोबाईल देण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये सोमवारी अडीच हजार अंगणवाडी सेविकांपैकी एक हजार सेविकांनी मोबाईल प्रशासनाकडे जमा केले तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अनेक त्रुटी असून, त्या दूर करण्याचीही मागणी सेविकांनी केली.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष आनंदी भोसले, कार्याध्यक्ष विजया जाधव, सचिव नादीरा नदाफ आदींच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोाबईल प्रशासनाला परत करण्याचे आंदोलन सुरु आहे. यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामाची नोंद करण्यासाठी ‘पोषण ट्रॅकर’ हे ॲप दिले आहे. परंतु, ते पूर्णपणे इंग्रजीमधून आहे. अंगणवाडी सेविकांचे शिक्षण कमी झाल्यामुळे त्यांना इंग्रजीत माहिती भरणे शक्य नाही. त्यामुळे हे ॲप पूर्णत: मराठीच असावे. पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यांचा अभ्यास करून नंतर ते काम आम्हाला द्यावे. या ॲपमध्ये सर्वेक्षण नाही, वयोगटाप्रमाणे मुलांची यादी येत नाही, वयाप्रमाणे नावे बदलत नाहीत अशा अनेक त्रुटी आहेत. मुलाचे वजन, उंची, लसीकरण, गृहभेटी, विविध कार्यक्रम, आहार वाटप, दैनंदिन हजेरी, साठा रजिस्टर याची नोंद ठेवणे गरजेचे असते. परंतु, ही नोंद ठेवण्यासाठी हा मोबाईल चांगल्या दर्जाचा नसल्यामुळे वेळेत काम होत नाही. तसेच माहिती भरताना मोबाईल मध्येच बंद पडतो. अनेक मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे, यामुळे ॲपवर माहिती भरताना अडचणी येत आहेत. म्हणूनच शासनाने अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल द्यावेत, या मागणीसाठी सेविकांचे आंदोलन सुरु आहे.